15 व्या अध्यायातील उपमा

गंध वाहून नेणारा वारा – जीवात्मा – कधी कधी आपल्याला आपल्या जवळपास कुठेही त्या वस्तू नसतांना अचानक चाफ्याचा, उदबत्तीचा, एकाद्या उत्तम पदार्थाचा तीव्र वा मंद सुगंध येतो. आपण सहजपणे म्हणतो की वाऱ्याबरोबर हा सुवास आला. कधी कधी हे दुर्गंधाच्या बाबतीतही घडते. अतिशय घाणेरडा, जळका, उग्र वास येतो. म्हणजेच वारा आपल्याबरोबर तो जिथून आलेला असेल तिथे असलेला वास आपल्याबरोबर दूरपर्यंत घेऊन जातो. याच उपमेच्या आधारे 15 व्या अध्यायात भगवंत सांगतात, “शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः। गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात्॥”

प्रत्येक जीवाला परमात्म्यापर्यंत जायचेच आहे. पण ही गोष्ट सहज शक्य नाही. त्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात. असे जन्म घेतांना ते कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतेॽ तर मनुष्य जी कर्मे करील त्यानुसार त्याला ते ते देह प्राप्त होतात. मग असे देह प्राप्त होतांना तो जीवात्मा आपल्याबरोबर काय काय नेतोॽ हे सांगतांना केल्या कर्मांचे फळ भोगण्यासाठी मनासहित जी इंद्रिये प्राप्त होतात त्यात आपली साधना, आसक्त्ती, त्रिगुणांनी प्राप्त झालेला स्वभाव या गोष्टी ज्या देहाचा त्याग केला तेथून वाऱ्याने गंध घेतला त्याप्रमाणे घेऊन जात असतो असे भगवंत सांगतात. इतर योनींच्या जन्मात फक्त्त भोगच घेता येतात. मनुष्य जन्मात मात्र यातून सुटका करुन घेण्याची संधी असते. उत्तम कर्मे आधीच्या जन्मात केलेली असली तर त्या कर्मांचे सुफळ मनुष्य भोगतो व अनहितकारी कर्मे केलेली असतील तर दुःखदायक फळे भोगतो. हे वर्म कळले तर प्राप्त भोग निर्लेपपणे भोगून जीव सद्गतीकडे मार्ग क्रमण करु शकतो.


टिप्पण्या